शाळांमध्ये आता पर्यावरण सेवा योजना

संदर्भ-सकाळ वृत्तसेवा प्रशांत हिंदळेकर

मालवण - शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पर्यावरण विभागाची ही योजना सुरवातीला राज्यातील 12 जिल्ह्यांतील 50 शाळांमध्ये राबविली जाणार आहे.

पर्यावरण सेवा योजनेमध्ये स्थानिक पर्यावरणाशी निगडित समस्या, प्रत्यक्ष सहभाग व कृतीच्या आधारे समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे. निसर्ग व मानव यांच्यातील परस्पर संबंध, समजून घेऊन तो जोपासण्याचे महत्त्व बालपणातच बिंबविणे. पर्यावरणविषयक कृती, प्रतिनिधित्व व संवादकौशल्य या बाबी विकसित करणे. शाश्‍वत विकासासाठी आवश्‍यक आचार-विचारांचे आदान-प्रदान, जडणघडण व त्याद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी नेतृत्वगुण विकसित करणे. स्थानिक पातळीवर नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनाबाबत स्थानिक लोकांच्या सहभागाने प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबविणे ही योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे साध्य करताना मुलांच्या शिक्षणासाठी परिणामकारक साधनांचा व नावीन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून प्रत्यक्ष कृतीतून तसेच निसर्ग निरीक्षणातून अनुभव शिक्षण, पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी उपक्रम राबविणे या गोष्टींचा अंतर्भाव असणार आहे.

राज्यात प्रदूषणाची समस्या जास्त असणाऱ्या 12 जिल्ह्यांतील 50 इच्छुक शाळांमध्ये ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे. शाळांचा सहभाग हा स्वेच्छेने घेतला जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित शाळांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. योजनेच्या सुरवातीस प्रायोगिक तत्त्वावर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे हे राज्यस्तरीय संनियंत्रण संस्था म्हणून कामकाज पाहणार आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही संस्था कार्यवाही करणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेत 50 मुलांचा पर्यावरण सेवा योजनेचा गट तयार केला जाणार आहे. त्यात सातवी ते बारावीपर्यंतच्या कोणत्याही विद्यार्थ्याला स्वेच्छेने सहभागी होता येणार आहे. शाळांमध्ये या योजनेअंतर्गत उपक्रम राबविण्यासाठी तीन वर्षांसाठी एक योजनाप्रमुख नेमला जाणार आहे. दहा शाळांच्या गटाचे काम पाहण्यासाठी जिल्हास्तरावर एक गटसमन्वयक नियुक्‍त केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत पर्यावरण सेवा गटामार्फत स्थानिक पर्यावरणास अनुकूल असे जैवविविधता, प्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत यासारखे प्रकल्पही राबविले जाणार आहेत.