स्वागतकक्ष

विनम्र आवाहन

सप्रेम नमस्कार,

भारत सरकारच्या ‘सर्व शिक्षा अभियान’ योजनेस मदत म्हणून ज्ञानदीप फौंडेशन सर्वांसाठी मोफत शिक्षण देण्याच्या हेतूने www.school4all.org हे संकेतस्थळ सुरू करीत आहे.
शिक्षण प्रसारासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. कारण इंटरनेटवर विविध विषयावरील ज्ञानाचा अपार साठा आहे. अनेक संकेतस्थळांवरून आपणास हे ज्ञान सहज व मोफत मिळू शकते. यात प्रश्नमंजूषा, चित्रे, आकृत्या, ध्वनीफिती व चित्रफिती यांचा वापर करून अतिशय योजनाबद्ध स्वरुपात माहिती मांडलेली असते. मात्र याविषयी फारच थोड्या पालकांना, शिक्षकांना वा विद्यार्थ्यांना माहिती असते. यासाठी अशा योग्य संकेतस्थळांतील विशिष्ट माहिती शोधून ती विषयानुसार या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मात्र या संकेत स्थळांचे माध्यम इंग्रजी असल्याने मराठी माध्यमाच्या मुलांना त्याचा लाभ घेता येणार नाही. यासाठी माहितीचे मराठीत भाषांतर वा स्पष्टीकरण सोबत देण्याची योजना आहे.

शिक्षक, विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञ यांच्या मदतीने हे संकेत स्थळ पूर्णपणे विकसित करण्याची योजना आहे.

यापूर्वी मराठी, संस्कृत व विज्ञान या विषयांसाठी ज्ञानदीप फौंडेशनने स्वतंत्र संकेतस्थळांची निर्मिती केली आहेच. आता इतिहास, भूगोल, गणित, चित्रकला इत्यादी विषयांची माहिती संकलित करण्यात येईल.या संकेत स्थळासाठी प्रामुख्याने मराठी माध्यम वापरले जाईल मात्र आवश्यक तेथे इंग्रजीचा वापर केला जाईल. इतर भाषांचा समावेश भविष्यात होऊ शकेल.