सूर्य पेरणारा माणूस

प्रस्तुत पुस्तकाचं नाव वाचताच क्षणभर मी स्तंभित झाले. ‘सूर्य पेरणारा माणूस’ सर्वस्वी नवीनच ! ह्य पुस्तकाच्या नावापासूनच त्याचं आगळंवेगळेपण दृष्टीस येतं. जिद्दीच्या बिया घेऊन सूर्याची पेरणी करणे ही अभिनव कल्पना लेखक प्रवीण दवणे यांनी आपल्या समर्थ लेखणीतून साकार केली आहे. पुस्तकाचे बाह्यरंगही नाविन्यपूर्ण आहे. पुस्तक तसे अगदी नवीन आहे पण त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ६००० प्रतींची प्रथम आवृत्ती ८ मे २००८ रोजी निघाली. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यात (८ जुलै २००८ रोजी) द्वितीय आवृत्ती पुन्हा ६००० प्रतींची काढावी लागली. याचं श्रेय पुस्तकाच्या भावस्पर्शी कथाबीजात आहे. तसेच ते लेखकाच्या समृद्ध लेखणीत व प्रकाशकाच्या मेहनतीतही आहे.
सूर्य पेरणारा माणूस
लेखक - प्रवीण दवणे
साप्ताहिक विवेक
हिदुस्थान प्रकाशन
मूल्य - १०० रू.
‘ सतीश हावरे, आपल्या अभंग व उत्तुंग कर्तृत्वास कृतज्ञापूर्वक समर्पित !’ ही अर्पणत्रिका खुद्द नायकाला उद्देशूनच वाहिलेली आहे. त्याबद्दल कौतुक वाटते. केवळ ७ - ८ वर्षाच्या अल्पावधीत बांधकामक्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करून अस्तास गेलेल्या सतीश हावरे याची जीवनगाथा ! विदर्भतील पथ्रोट नामक लहानशा गावात बालपण, शालेय शिक्षण घेतलेला सामान्य मुलगा आपल्या दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर आभाळाएवढी उंची कशी गाठू शकतो याचे प्रत्यक्ष दर्शन लेखकाने घडवून आणले आहे. सतीश हावरे यांची सतत काम करण्याची जिद्द व जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर भावी युवकातून असे अनेक उद्योगी सतीश उदयाला येतील अशी खात्री लेखकाला आहे.
उण्यापुर्‍या ३५ - ३६ वर्षाच्या कालावधीत सतीशजींनी जे महान कार्य करून दाखविले ते केवळ शब्दातीत आहे. यशासाठी काय लागतं ? पैसा, परिस्थिती, नशीब, वारसा, व्यक्तिमत्व की आणखी काही ? पण यापैकी काहीही नसलेला माणूस केवळ स्वतःच्या विलक्षण जिद्दीच्या भांडवलावर आकाशाला गवसणी घालू शकतो हीच गोष्ट अनाकलनीय वाटते. सतीश हावरे यांनी ही सत्यात उतरवून दाखविली आहे. श्रीमंतांसाठी बांधल्या गेलेल्या टोलेजंग इमारती आज आपणास सर्वत्र दिसतात. पण गरीब माणसांनाही आपले स्वतःचे घर असावेसे वाटते. तेव्हा त्याव्यासाठीही अशी घरे बांधण्याचे धाडस करणारे सतीश हावरे हे पहिलेच. गरीबांना परवडतील एवढ्या पैशात घर बांधून देण्याच्या विचाराने झपाटलेल्या सतीशजींनी ती कल्पना प्रत्यक्ष कतीत आणून दाखविली. त्यातूनच ‘श्रमिक’ सारखी भव्य वास्तू उभी राहिली आणि तीही नव्या मुंबईसारख्या भागात. यातून सर्वसामान्य, गोरगरिबांविषयी त्यांच्या मनात असलेल्या अपार करूणेचे, त्यांच्या उदार वृत्तीचे दर्शन घडते. बांधकामावर असणार्‍या मजुरांना आवश्यक असणार्‍या सर्व सुविधा पुरविण्यासाठी स्वतः सतीशजींनी सर्वतोपरी प्रयत्न केले. बांधकामावरील कामगारांच्या कुटुंबाची शैक्षणिक, आरोग्यविषयक, जेवणखाण्याचीही तरतूद केली. पण केवळ फुकट कोणाला उदरनिर्वाह करता येईल असे नाही. श्रमाचे महत्व स्वतःच्या कृतीतून सर्वांना दाखवून दिले होते. ते स्वतः दिवसातले १६ तास काम करीत असत. म्हणून आळस किंवा कामाविषयी कंटाळा करणारी माणसे त्यांना कधीच आवडत नसत.
सतीशजीचे जाणवणारे वेगळेपण म्हणजे ग्राहकाला दिलेला शब्द ते काटेकोरपणे पाळीत असत. बांधकामाची आखणी करतानाच वेळेचेही नियोजन केलेले असे. त्यामुळे वेळेच्या आतच बांधकामाची पूर्तता करण्यात हावरे बिल्डर्सशी बरोबरी करणे दुसर्‍या कोणालाही जमले नाही. एकापाठोपाठ एक बांधकामे करण्याचा त्यांनी सपाटा लावला होता. पण हे करताना त्यांच्या कामाचा दर्जा मात्र सर्वत्र उत्तमच होता. आणखी ५० वर्षे काम सतत करता येईल यासाठी जमीनीची योजना सुद्धा करून ठेवली होती. बांधकामासाठी कच्चा माल, सिमेंटचा साठा भरपूर लागतो. त्यासाठी सिमेंटचा कारखाना काढण्याची योजना होती. यावरून त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते. सामाजिक बांधिलकीची जाणीव लहनपणापासूनच होती त्यामुळे कोणत्याही सार्वत्रिक कामात हावरे बिल्डर्सचा मोठा सहभाग होता. ‘खूप खूप जगायचं आहे ते केवळ पैसा मिळविण्यासाठी नव्हे तर खूप खूप काम करण्यासाठी’ हे सतीशजींचे ब्रीदवाक्य होते. अत्यंत हुशार, सुशील असलेल्या आपल्या पत्नीला - उज्वलाताईंनाही त्यांनी आपल्या कामात सहभागी करून घेतले होते.
सतीशजीच्या अकाली जाण्याने हावरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण त्यामुळे केवळ खचून न जाता त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून पुढे जाण्यासाठी हावरे कुटुंबाने कंबर कसली. भरपूर कष्ट करून मातीतून मोती, सोने पिकविणार्‍या उद्योगशील युवकांना शिक्षण देण्याची अभिनव योजना हावरे बिल्डर्सने सुरू केली. आणि ‘सतीश हावरे उद्योजक शिक्षण संस्था’ स्थापन झाली.
या पुस्तकामुळे सामान्य जनतेतून सुद्धा अनेक नवीन उद्योजक निर्माण हॊण्यास मदत होईल याबाबत तिळमात्र शंका नाही. आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी वाचकांपर्यंत प्रभावीपणे मांडण्याची लेखकाची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. लेखकाने आपल्या भगीरथ प्रयत्नांनी सतीश हावरे या धडाडीच्या उद्योजकाची जीवनगाथा शब्दरूप करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
-------सौ. शुभांगी सु. रानडे, ज्ञानदीप, सांगली