शंवाकिय - शंतनुराव किर्लोस्कर

शंतनुराव किर्लोस्कर ( ‘शंवाकिय’ या आत्मचरित्रातून)
यशाचे शिल्पकार - गुणी कामगार
एकदा मोल्डिंग खात्यातल्या कामगारांना मी सांगत होतो की, ‘विलायतेतले कामगार नुसतंच चांगलं काम करीत नाहीत, भरपूरही करतात. तीच दृष्टी ठेवायला हवी. तरच त्यांच्याशी टक्कर देण्याचं आपलं काम सोपं होईल.’
माझे बोलणे ऎकून त्या खात्यातील दादू माने, विठू न्हावी व त्यांचे दोघे मदतनीस यांनी आठ तासात दोनशे मोल्ड घालून व त्यात रस ओतून तितके नांगराचे भाग तयार करून दाखविले ! हा त्यांचा पराक्रम पहायला लक्ष्मणरावांपसून सारे कामगार व घरातील मंडळी येऊन गेली. त्यांच्या या कामगिरीबद्दल लक्ष्मणरावांनी त्यांना योग्य पारितोषिक दिले. अशा गुणांचा योग्य गौरव केल्यानेच कोणताही कारखाना डोके वर काढू शकतो.
आमच्या नांगराची विक्री पाऊसपाण्यावर अवलंबून असे. ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत हा हंगाम चालायचा. त्या साली पीकपाणी चांगले झाले होते. त्यामुळे तयार झालेला माल पार खपून गेला. यार्डात एकही नांगर शिल्लक राहिला नाही. त्याचवेळी मोगलाईतील एक ग्राहक मुल्ला नजफअल्ली कमरुद्दीन कारखान्यात आले. मिरज येथे हॉस्पिटलमधे ऑपरेशन झालेल्या त्यांच्या एका नातेवाईकाची भेट घेण्यासाठी ते आले होते. मिरजेला आल्यावर वाडीलाही भेट द्यावी असे वाटून ते आमच्याकडे आले.
मी मुल्लासाहेबांना म्हणालो, ‘ आपण आलात याबद्दल आम्हाला आनंद वाटतो, पण आम्हाला ऑर्डर दिल्याशिवाय आपण जावं हे ठीक वाटत नाही. ’
ते खो खो हसत म्हणाले, ‘ आप सच कहते है, लेकिन आपके पास नांगर हैही कहॉं ?’
त्यांचे म्हणणे अगदी खरे होते. तितक्यात कारखाना सुटल्याची घंटा झाली. कामगार नेहमीचे कपडे करून हळूहळू बाहेर पडू लागले होते.
मी मुल्लासाहेबांना म्हणालो, ‘आपण ऑर्डर तर द्या. आम्ही माल दिला नाही तर आमची आपोआप परीक्षा होईल.’
‘ठीक आहे. घ्या तर माझी पन्नस नांगरांची ऑर्डर ’, मुल्लासाहेब लगेच म्हणाले.
मी चटकन्‌ कारखान्याच्या घंटेकडे गेलो व ती वाजवायला सुरुवात केली. कामगारांना हा काय घोटाळा अहे ते समजेना ! ते पुन्हा कारखान्याच्या दारात जमले तेव्हा मी म्हणालो, ‘आपलं आजचं काम संपलं आहे. पण आत्ताच हे गिर्‍हाईक मोगलाईतून आलं आहे. त्यांना पन्नास नांगर हवेत, पण ते आजाच्या आज मिळाले पाहिजेत अशी त्यांची अट आहे. आपल्याकडे एकही नांगर तयार नाही हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तेव्हा आपण काय करायचं, हे विचारायला घंटा देऊन मी तुम्हाला बोलावलं आहे. ’
कामगारांनी त्यांचे उत्तर कृतीनेच दिले. आपले कपडे उतरवून ते पुन्हा कामाला लागले. आम्ही खात्यात हिंडून सर्वांना हुरूप देत होतो. कामगारांनी साच्याची माती कालवली. भट्टी पुन्हा लिंपली. तिच्यात कोक, पिग, आयर्न भरले. भराभरा मोल्ड तयार होऊ लागले. पंखा सुरू झाला, व त्याच्या सुरात कास्टिंग्ज बाहेर पडून एमरीकडे निघाली. पुढे नांगर जोडून त्यांना रंग देण्याचे काम सुरू झाले. ते तपासल्यावर त्यांना मार्क घालून ते स्टेशनला रवाना करायचे आणि रेल्वे वॅगनमध्ये हे नांगर चढवायचे हे पुढचे कामदेखील पाठोपाठ सुरू झाले.
मुल्लासाहेबांनी कंदिलाच्या उजेडात आपली हुंडी लिहून दिली व शेवटी कामगारांना शाबासकी दिली. दुसर्‍या दिवशी कारखान्याला सुट्टी दिल्याचे सांगून आम्ही घरचा रस्ता सुधारला.