शारदाबाई गोविंदराव पवार

‘प्रत्येक थोर पुरुषाच्या पाठीशी एक कर्तव्यदक्ष स्त्री असते’ असं म्हणतात ते सर्वस्वी खरे आहेच. पण त्याहीपुढे जाऊन असं म्हणता येईल की जन्माला आलेल्या प्रत्येक लहान मुलाच्या वा मुलीच्या पाठीशी जी खंबीरपणे उभी असते ती व्यक्ती दुसरी - तिसरी कोणू नसून त्याची आईच असते. आईच्या वर्तणूकीतूनच लहान बालकावर संस्कार केले जातात. पण जिजाबाईसारख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच स्त्रिया समाजमान्यता पावतात. परंतु काही स्त्रिया अशा आहेत की ज्या स्वतः उदबत्तीप्रमाणे झिजतात. पुढील पिढीला सुसंस्कारित करतात. एवढेच नव्हे तर गरूड्झेप घेण्यासाठी त्यांच्या पंखात सामर्थ्य निर्माण करतात. शारदाबाई गोविंदराव पवार म्हणजे अशा स्त्रियांपैकी एक उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांची जीवनगाथा ‘शारदाबाई गोविंदराव पवार’ या प्रस्तुत पुस्तकातून वाचकांसमोर उलगडून दाखविण्यात आलेली आहे. पुस्तक बांधणी ठसठ्शीत असून त्यावरील पांढर्‍या शुभ्र मुखपृष्ठावरील शारदाबाईंचा धीरोदात्त चेहरा बघताक्षणीच वाचकाच्या मनात आदरभाव निर्माण करतो. ५ - १० फोटो वगळता सर्व पुस्तकातील मजकूर अत्यंत साधेपणाने लिहिलेला आहे. कोणतीही वायफळ कालाकुसर करून पुस्तकाची पाने सजविण्याचा प्रयत्न केलेला नाही. पुस्तकातील आखीव, रेखीव अक्षर पाहून वाचकाचे लक्ष वेधून घेतले जाते. यातून प्रकाशकाची साधी राहणी व उच्च विचारसरणी दिसून येते.

लहानपणीच वडिलांच्या मायेला पारखे व्हावे लागले. एकापाठोपाठ एक जबाबदार्‍या अंगावर पडल्याने खेळण्याबागडण्याचे फुलपाखरी दिवस कधी व कसे सरून गेले ते कळलेच नाही. पुण्याला सेवासदनमध्ये फायनलपर्यंत शिक्षण झाले. त्याकाळी म्हणजे १९२५ च्या सुमारास फायनलपर्यंत शिकलेल्या स्त्रिया म्हणजे विशेषच होते. सेवासदनमधील शिस्त अंगी बाणल्याने स्वच्छता, टापटीप, वागण्याबोलण्यातील टापटीप, वागण्याबोलण्यातील नीटनेटकेपणा हा शारदाबाईंचे खास वैशिष्ट्य होते. सुंदर, वळणदार, रेखीव अक्षर व वाचनलिखाणाची भरपूर हौस हे गुणही त्यांनी आत्मसात केले होते. तसेच भरतकाम, विणकाम, चित्रकला याच्या जोडीला उत्तम स्वयंपाक करण्याची कलाही त्यांनी जोपासली होती.

अशा ह्या शारदाबाई म्हणजे शरद पवारसाहेबांच्या मातोश्री. ‘११ मुलांची आई’ एवढीच त्यांनी आपली ओळख ठेवली नाही तर ‘समाजाला हिमालयाएवढ्या उंचीची मुले देणारी आई’ म्हणूनही त्या अधिक महान होत्या. शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःपुरताच नव्हे तर सर्व कुटुंबाचा उद्धार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. घरादारात सर्वजणच त्यांना ‘बाई’ म्हणत. आर्थिक, सामाजिक कोणतीच पार्श्वभूमी नसताना केवळ स्वतःच्या बुद्धिवादी विचारसरणीने जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्श केला. आपल्या सर्व मुलांवर उत्तम संस्कार करून त्यांच्या मनात देशप्रेमाची ज्योत कशी जागृत केली हे मुळातून वाचण्यासारखे आहे.
आपल्याला जमले नाही तरी मुलांना असामान्य बनविण्याची प्रबळ महत्वाकांक्षा शारदाबाईंना होती. त्यासाठी परिस्थितीवर मात करण्याची व तिला जिकायची जिद्द, काहीतरी वेगळे करून दाखवायची उर्मी त्यांच्यात होती.

सेवासदनमधील संस्कारांची व शिक्षणाची शिदोरी शारदाबाईंना आयुष्यभर उपयोगी पडली. गोविंदरावांबरोबर समाधानाने संसार करता करता जिल्हा लोकल बोर्डावरही त्या निवडून आल्या. इतर सामाजिक कामे करण्यातही त्यांचा सदैव पुढाकार असे. जिल्हा लोकल बोर्डामधील त्यांचे काम अचंबित करणारे होते. परंतु तितकीच प्रसिद्धिपराङ्‌मुखता त्यांच्याजवळ होती. मुळच्याच सुस्वभावी असणार्‍या शारदाबाईंनी कधीही दुसर्‍याची निदानालस्ती केली नाही. कोणतीही गोष्ट येते नाही असे म्हटलेले त्यांना मुळीच आवडत नसे. स्वतः टांगा चालवून त्या शेतावर जात असत. शेतीत विविध प्रयोगही त्यांनी केले. स्वतःच्या मुलींनाही घोड्यावर बसणे, चारचाकी चालविणे, मोटरसयकल चालवायला शिकविले. मुलांच्या बरोबरीने मुलींनीही सर्व प्रकारच्या खेळात भाग घेतलाच पाहिजे, तसेच सर्व घ्ररकाम करीत असताना घरगुती विद्युत उपकरणांची दुरुस्ती सुद्धा करता आली पाहिजे याबद्दल त्यांचा आग्रह होता. स्वतःच्या पायाला अपघात झाला तरी वयाच्या साठाव्या वर्षी जिद्दीने क्लास लावून त्या ड्रायव्हिंग शिकल्या ही कौतुकास्पद गोष्ट आहे.

शारदाबाईंचे जीवन प्रवाही होते.
डोंगराएवढ्या संकटांना न डगमगता पुढे जाण्याची विलक्षण ताकद त्यांच्यात होती. आणि म्हणूनच मोठा मुलगा अचानकपणे काळाआड गेला तरी ते दुःख पचवून, केवळ मुळुमुळू रडत न बसता त्यांनी मोठ्या धैर्याने संकटाला तोंड दिले. सुनेला धीर देऊन वकिली शिकण्यास प्रवृत्त केले. ‘सुनांच्या संसारात लुडबुड न करणारी सासू’ हा त्यांचा खास गुण होता. शरदरावांची उमेद पाहून पक्ष विसरून राजकारणात खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अपघातामुळे त्यांना कुबड्य़ा घेऊन चालावे लागे. पण त्यांना कधीच त्याची खंत वाटली नाही. आपल्या आजारपणाचा बाऊ करणे त्यांना अजिबात आवडत नसे. ५० वर्षे नीटनेटकेपणाने संसार करून अखेर वयाच्या ६४ व्या वर्षी कावीळ झाल्याने शारदाबाईंना आपली इहलोकची यात्रा संपवावी लागली.

हे पुस्तक वाचल्यावर शारदाबाईंचा आदर्श घेऊन अनेक माता सार्‍या महाराष्ट्रातून पुढे येतील व भारताला उत्तम नेतृत्व मिळवून देतील असा मला विश्वास वाटतो. .

शारदाबाई गोविंदराव पवार
लेखिका - सौ. सरोजिनी नितीन चव्हाण
सकाळ प्रकाशन
द्वितीय आवृत्ती - १ जाने. २००८
पृष्ठसंख्या - १९५
किंमत - १५० रु.