डॉ. सालिम अली

पक्ष्यांच्या गोड किलबिलाटामुळे साखरझोपेतूनही जाग येते. आजही तसंच झालं. पण नेहमीच्या या किलबिलाटात आणखी एक वेगळा आवाज जाणवत होता. ‘ हा धनेश तर नाही ? . . . हो धनेशच हा !’ असा मनाशी विचार करत मी परसदारी गेले. नारळाच्या झाडाच्या उंच शेंड्यावर बसून धनेश साद घालीत होता. त्याची ती भलीमोठी बाकदार चोच पाहताच पक्षितज्ञ डॉ. सालिम अली यांची आठवण झाली. वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या डॉ. सालिम अली यांच्या चरित्रपर पुस्तकाचे मुखपृष्ठच डोळ्यासमोर तरंगून गेले. झाडाच्या फांदीवर बसलेले सालिम अली. होय सालिम अलीच, पण पक्षिरूपातले. धनेश पक्ष्याच्या चोचीसारखे बाकदार नाक. नाकावरचा काळा चष्मा. डोक्यावर हॅट आणि पक्षिनिरीक्षणासाठी गळ्यात अडकवलेली दुर्बिण. हे पुस्तक म्हणजे खरोखर कमाल आहे. तसं म्हटलं तर चरित्रलेखन हा प्रकार जरा कंटाळवाणा. पण वीणाताईंच्या लेखणीचे खरे कौशल्य यातच आहे की पुस्तकातील सर्व प्रसंगच दृश्य स्वरूपात वाचकाच्या डोळ्यासमोर उभे राहतात. उण्यापुर्‍या ९० पानात अलीसाहेबांचे समग्र चरित्र गुंफायचे म्हणजे कही साधसुधं काम नव्हे. त्यासाठी त्यांनी ‘ पाऊलखुणा ’, ‘ पक्षियात्रा ’, ‘ घेतला वसा ’, ‘ ग्रंथपिसारा ’, ‘ पक्षिगण ’ व ‘ इति ’ अशा सहा विभागांची योजना केली आहे. प्रत्येक विभागाच्या सुरुवातीला त्या त्या विभागाला अनुसरून काढलेली वैशिष्ट्यपूर्ण पक्षिचित्रे वाचकाचे मन आकर्षून घेतात.
वयाच्या तिसर्‍या वर्षापसून आईवडिलांच्या मायेला पारखा झालेल्या छोट्या सालिमचे बालपण आपल्या मामांच्या सावलीत गेले. मामा पट्टीचे शिकारी. दहाव्या वर्षाच्या वाढदिवसाला भेट म्हणून मिळालेल्या बंदुकीने सालिमही चिमण्यांची शिकार करू लागला. पण एका पीतकंठी चिमण्यामुळे सालिमच्या मनात पक्षिनिरीक्षणाबद्दल कुतूहल निर्माण झाले. पक्ष्य़ांची वेगवेगळ्या प्रकारची घरटी, अंडी यासारख्या गोष्टींचे तो बारकाईने टिपण ठेवी. पक्ष्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, विशिष्ट प्रकारचे आवाज, त्यांची नावे, त्यांची रंगसंगती, चोचींचे आकार इत्यादी गोष्टींच्या नोंदी ठेवायची चांगली सवय त्याला लहानपणापसून लागली होती.
पक्षिजीवनाचा अभ्यास करण्याची विलक्षण ओढ सालिम यांना लागली होती. त्यामुळे कॉलेजचे शिक्षण घेऊन सुद्धा व्यापार-उदीम करण्यात त्यांचे मन मुळीच रमेना. जर्मनीत पक्षिवर्गीकरण करण्याच्या प्रशिक्षणासाठी जाण्यास ते एका पायावर तयार झाले. पक्ष्यांच्या पायात कडी घालण्याच्या मोहिमेतही ते सहभागी झाले. जर्मनीहून परत आल्यानंतर भारतीय पक्ष्यांच्या वर्तनशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यानी कंबर कसली.
अलीसाहेबांचे चरित्रकथन करताना लेखिकेने केवळ वर्णनपर लिखाण न करता संवादांची पेरणी सर्वत्र केलेली आहे. त्यामुळे त्या कथनाला गति आलेली आहे. अलिबागजवळील किहिम येथे वास्तव्य असतानाचा प्रसंग मोठ्या खुमासदारपणे रेखाटला आहे. बाया सुगरण पक्षी घरटे कसे बांधतो याचे अलीसाहेबांनी तासन्‌तास बसून दुर्बिणीतून निरीक्षण करून त्याच्या अनेक नोंदी ठेवल्या. सुगरणीचं घरटं आपल्याला सर्वांना फार आवडतं. पण ते बांधताना होणारी गंमत आपल्याला ठाऊक नव्हती. सुरुवातीला नर अर्धेच घरटे बांधतो. नंतर बाईसाहेब म्हणजे मादी घरट्याचे बांधकाम आतून कसे झाले आहे ते बघते. तिला ते पसंत पडले तरच उरलेले घरट्याचे काम नर पूर्ण करतो. मग त्यात अंडी घालून पिलांची देखभाल करण्याचे काम पिलांची आई करते. हा प्रसंग वाचकाच्या डोळ्यासमोर यावा म्हणून त्याठिकाणी एक छोटेसे पण अत्यंत बोलके चित्र काढलेले आहे. एका झाडाच्या खोक्यावजा मचाणाचरून दुर्बिणीतून बघणारा एक मनुष्य - अलीसाहेब व दुसर्‍या फांदीवरील घरट्यावर बसलेले दोन सुगरण पक्षी. एक पक्षी दुसर्‍याला
म्हणतोय ‘ आता आपल्यात गुपित म्हणून काही राहणार नाही.’ यातून वाचकाला आपल्याबरोबर घेऊन जायचे लेखिकेचे कसब मोठे वाखाणण्याजोगे आहे. अशी बोलकी (पक्ष्यांच्या भाषेतील) चित्रे आपल्याला बर्‍याच ठिकाणी पहावयास मिळतात. सुगरण पक्ष्याच्या या वर्तनावर अलीसाहेबानी जर्नलमध्ये नाविन्यपूर्ण लेख लिहिला.
यानंतर अलीसाहेबांनी भारताच्या कानाकोपर्‍यात सर्वत्र काढलेल्या अनेक पक्षियात्रांची, मोहिमांची आपणास माहिती मिळते. त्यातून त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडून दाखविण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे. भारत सरकारचा ‘ पद्‍मभूषण ’ पुरस्कार सालीम अलींना मिळाला. एवढेच नव्हे तर नोबेल पुरस्काराच्या तोडीच्या ‘ पॉल गेट्टी ’ या अमेरिकन पारितोषिकाचे मानकरी होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला. १९५३ ते १९८७ या काळात त्यांना श्रेष्ठ व ज्येष्ठ पक्षितज्ञ म्हणून २२ पुरस्कारांनी गौरविले गेले व बघता बघता ते जागतिक कीर्तीचे पक्षितज्ञ म्हणून मान्यता पावले. अनेक विद्यापीठांनी त्यांना ‘ डॉक्टरेट ’ ही पदवी बहाल केली.
डॉ. सालिम अली याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बर्‍यावाईट प्रसंगाचीही दखल लेखिकेने घेतली आहे. ‘ तेहमिना ’ या त्यांच्या सुविद्य पत्नीची साथ थोड्या अवधीपुरतीच लाभली. पण खचून न जाता प्क्षीजीवन व निसर्गसंसक्षण हेच आपल्या आयुष्याचे अंतिम ध्येय मानले. अलीसहेबांनी दुर्बिणीबरोबरच लेखणी हातात धरली. भारतीय पक्षीजीवनावर त्यांनी अनेक मोठ्मोठे ग्रंथ लिहिले. ‘ हॅंडबुक ऑफ बर्डस्‌ ऑफ इंडिया, पाकिस्तान ’ या त्यांच्या दशखंडात्मक ग्रंथराजाने भारतीय पक्षिशास्त्रात मोलाची भर टाकली आहे. जगातील सर्व पक्षितज्ञांकडून त्यांच्या लिखाणाची वाहवा झाली. प्रत्येक ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. ‘द फॉल ऑफ अ स्पॅरो ’ हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजे लेखनकलेचा खास नमुनाच होय. अत्यंत समृद्ध ब्रिटिश वळणाची इंग्रजी भाषा, मोजक्या शब्दातील मांडणी, मधून मधून विनोदाचा शिडकावा, प्रत्ययकारी निवेदनशैली यामुळे त्यांच्या आत्मचरित्राला वेगळाच बाज आला आहे. अशा या थोर भारतीय पक्षितज्ञाचा, त्याच्या अनमोल कार्याचा अत्यंत साध्या सोप्या भाषेत परिचय करून दिल्याबद्दल लेखिकेला धन्यवाद !
या पुस्तकामुळे वाचकांना पक्ष्यांच्या नितांत सुंदर व निरागस भावजीवनाची ओळ्ख होईल. तसेच जनसामान्यात निसर्गसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. सर्वांनी हे पुस्तक एकदा तरी मुळातून जरूर वाचावे असे मला वाटते. ---- सौ. शुभांगी सु. रानडे, ज्ञानदीप, सांगली

डॉ. सालिम अली
लेखिका - वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन (सातवी आवृत्ती जुलै २००६)
किंमत-५५ रुपये