त्रिकोण

एका सरळ रेषेत नसलेले तीन बिंदू सरळ रेषांनी जोडून तयार झालेल्या आकृतीस त्रिकोण म्हणतात. या रेषांना त्रिकोणाच्या बाजू म्हणतात. त्रिकोणाच्या आकृतीतील सर्वात खालच्या बाजूला त्रिकोणाचा पाया म्हणतात. सर्वात वरच्या कोनबिंदूला शिरोबिंदू. शिरोबिंदूपासून पायावर टाकलेल्या लंबरेषेच्या, शिरोबिंदू ते पाया या लांबीला त्रिकोणाची उंची म्हणतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज १८० अंश असते. त्यामुळे कोणतेही दोन कोन माहीत असल्यास तिसरा कोन सहज काढता येतो. त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूसमोरील कोन सर्वात मोठा असतो. त्रिकोणाचा पाया व उंची माहीत असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते.
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२*पाया*उंची
बाजूंची तुलनात्मक लांबी विचारात घेऊन त्रिकोणांचे तीन प्रकार पडतात. समभुज त्रिकोण
तिन्ही बाजू समान लांबीच्या असणार्‍या त्रिकोणास समभुज त्रिकोण म्हणतात. या त्रिकोणाचे तीनही कोन समान मापाचे, म्हणजेच प्रत्येकी ६० अशांचे असतात.
समद्विभुज त्रिकोण
त्रिकोणाच्या तीन बाजूंपैकी दोन बाजूंची लांबी सारखीच असेल तर त्या‍ त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण म्हणतात. समान बाजूंसमोरील कोन समान असतात, म्हणजेच या त्रिकोणातले दोन कोन सारख्या मापाचे असतात, आणि तिसरा वेगळ्या मापाचा.
विषमभुज त्रिकोण
सर्व बाजू असमान लांबीच्या असणार्‍या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण म्हणतात. या त्रिकोणाचे कुठलेही दोन कोन समान मापाचे नसतात.
त्रिकोणाच्या कोनांवरून पडलेले त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत.
लघुकोन त्रिकोण
या त्रिकोणात प्रत्येक कोन ९० अंशाहून कमी मापाचा असतो. विशालकोन त्रिकोण
या प्रकारच्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन (९० अंशापेक्षा मोठा) असतो.
काटकोन त्रिकोण
या प्रकारच्या त्रिकोणात एक काटकोन असतो. काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. कर्णाची लांबी उरलेल्या दोन बाजूंमधील प्रत्येक बाजूपेक्षा जास्त असते. इतर दोन बाजू पाया आणि उंची दर्शवतात, त्यामुळे त्यांची लांबी माहीत असल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते. प्रसिद्ध "पायथागोरसचा सिद्धांत" याच त्रिकोणास लागू होतो. त्या सिद्धांतानुसार या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असल्यास तिसरी बाजू आणि सर्व कोनांची माहिती मिळू शकते. काटकोनाव्यतिरिक्त आणखी एक कोन आणि तीन बाजूपैकी एक बाजू माहीत असली तरी, तिसरा कोन आणि इतर दोन बाजूंची माहिती काढता येते.