बुद्धिबळ परिचय

बुद्धिबळ (इंग्लिशमध्ये चेस व हिंदीमध्ये शतरंज) हा दोन खेळाडूंनी एका तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. बुद्धिबळाची सुरुवात भारतातून झाली.साहित्यामध्ये बुद्धिबळाचा पहिला संदर्भ इ.स. पूर्व ५०० मध्ये भारतात दिघ निकय मध्ये ब्रह्मजल सुत्त या ग्रंथात आढळतो. बुद्धिबळासाठी विविध भाषांत वापरले जाणारे शब्द भारतीय चतुरंग या शब्दापासून तयार झाले आहेत यावरून हे स्पष्ट होते. चतुरंग म्हणजे "सैन्याची चार अंगे" पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ. तसेच प्राचीन काळात फक्त भारतातच सैन्यांमध्ये घोडे, उंट आणि हत्ती हे तीनही प्राणी वापरले जात होते.शतरंजमधील मोहर्‍यांच्या चाली मर्यादित होत्या. सध्याचा उंट (ज्याला पूर्वी हत्ती म्हटले जायचे) त्याकाळी फक्त तिरपी दोन घरे उडी मारू शकत असे. मंत्री (म्हणजे सध्याचा वझीर) फक्त तिरपे एक घर जाऊ शकत असे; प्यादी सुरुवातीला दोन घरे जाऊ शकत नव्हती, आणि किल्लेकोटाची संकल्पनाच नव्हती. प्याद्यांना बढती मिळून फक्त मंत्री होता येत असे.इ.स. १२०० च्या दरम्यान दक्षिण युरोपमध्ये नियम बदलण्यास सुरुवात झाली आणि १४७५ च्या आसपास काही महत्त्वाचे बदल केले गेले.प्याद्यांना पहिली २ घरांची चाल मिळाली आणि त्यातूनच एन पासंट सुरू झाले. उंट आणि वझीर यांना आज वापरल्या जाणार्‍या चाली मिळाल्या. त्यामुळेच वझीर सर्वात महत्त्वाचा मोहरा ठरला. या बुद्धिबळाला "वझिराचे(राणीचे) बुद्धिबळ" संबोधले जाऊ लागले. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे बुद्धिबळ हे पाश्चिमात्य बुद्धिबळ म्हणून ओळखले जाते.
बुद्धिबळ सध्या जगातील सर्वात प्रसिद्ध खेळांपैकी एक आहे. जगभरात अदमासे ६० कोटी हौशी किंवा व्यावसायिक लोक क्लब्जमध्ये, पत्राने, आंतरजालावर व विविध स्पर्धांमधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला दिसतो.
बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो. या ८x८ च्या पटावर ६४ घरे असतात व ती आलटून पालटून क्रमाने काळ्या-पांढर्‍या रंगाची असतात. पहिला खेळाडू पांढर्‍या तर दुसरा काळ्या सोंगट्यांनी खेळतो. या सोंगट्यांना मोहरे म्हणतात. प्रत्येक खेळाडूचे एका रंगाचे सोळा मोहरे असतात.:- एक राजा, एक वजीर(राणी), दोन हत्ती(रुक), दोन घोडे(सरदार, नाइट), दोन उंट(बिशप) आणि आठ प्यादी(पॉन). प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह, म्हणजे मृत्यूचा धाक देऊन मात करणे(हरवणे) हा खेळाचा उद्देश असतो. राजाला शह मिळाल्यानंतर कुठलीही खेळी करून जेव्हा त्याला शहातून बाहेर पडता येत नाही त्यावेळी राजावर मात झाली असे मानले जाते. विचारवंतांनी बराच अभ्यास करून मात करण्यासाठी विविध क्रमांच्या चालींच्या खेळी रचल्या आहेत.
बुद्धिबळ एका ८ स्तंभ आणि ८ ओळींच्या चौरसाकृती पटावर खेळला जातो. स्तंभांना इंग्लिश a पासून h पर्यंत तर पंक्तींना १ ते ८ अशी नावे असतात. ६४ चौरसांचे रंग काळे-पांढरे असतात. सोंगट्या एकसारख्या काळ्या आणि पांढर्‍या अशा दोन संचात विभागलेल्या असतात. प्रत्येक संचात १६ मोहरे असतात. १ राजा, १ वझीर, २ उंट, २ घोडे, २ हत्ती आणि ८ प्यादी.
खेळाडू काळा किंवा पांढरा संच नाणेफेक करून निवडतात किंवा स्पर्धेच्या नियमानुसार कुणी कुठला संच घेऊन खेळायचे ते ठरते. प्रत्येक खेळाडूच्या उजव्या हाताच्या कोपर्‍यात पांढरा चौरस येईल अशा पद्धतीने पट मांडला जातो. काळ्या संचातील वझीर काळ्या घरात तर पांढरा वझीर पांढर्‍या घरात असतो.
पांढरा पहिली चाल करतो. नंतर प्रत्येक खेळाडू स्वत:चे मोहरे वापरून एकानंतर एक चाली करतात. मोहरे रिकाम्या घरात किंवा प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्‍याला मारून त्याच्या घरात ठेवता येतात. मेलेला मोहरा डावाबाहेर काढला जातो.
जर राजाला विरोधी मोहरा एका खेळीत मारू शकत असेल तर राजाला शह मिळाला असे म्हटले जाते. खेळाडू स्वत:च्या राजास शह बसेल अशी कोणतीही चाल खेळू शकत नाही तसेच स्वत:च्या राजास शह बसेल अशी कोणतीही चाल प्रतिस्पर्धी खेळाडूला शक्यतो करू देत नाही. इतके करून जर एखाद्या खेळाडूच्या राजाला शह मिळालाच तर त्याला राजाला एका खेळीत शहातून बाहेर काढणारी चाल करावी लागते. जर अशी चाल खेळता येत नसेल तर त्या खेळाडूची हार झाली असे मानले जाते. प्रत्येक खेळाडू दुसर्‍याचा राजावर मात करून त्याला हरवण्यासाठी चिकाटीने खेळतो. जो पहिल्य़ांदा यशस्वी होतो तो जिकला.संदर्भ व अधिक माहिती