पाढे पाठांतरास पर्याय नाही
कोणी काही म्हणो. बालवयात बुद्धी आणि उच्चार यात जलद प्रगती हवी असेल तर पाठांतरास पर्याय नाही. अंकगणित शिकताना पाढे पाठ असतील तर अंकगणित शिकणे फार सोपे जाते.
अगदी एक ते शंभर अंक लिहिताना देखील एक एके एक, दोन एके दोन, एकावर एक अकरा असे मोठ्याने तालात म्हटल्यास लिहिण्याकडे लक्ष राहते व अंक लवकर पाठ होतात.
एक ते शंभर अंकांची ओळख झाली व ते लिहिणे व वाचणे जमू लागले की पहिला टप्पा म्हणजे बेचे पाढे पाठ करणे. बे म्हणजे दोन. गेयता असल्यास पाठांतर लवकर होते. यासाठी दोन ऎवजी बे या सोयीस्कर शब्दाचा वापर केला जातो.
पाढे पाठ करताना दोन दोन ओळीत पाठ करावे. म्हणजे बे एके बेए, बे दुणे चार. यांनंतर थोडे थांबून पुढच्या दोन ओळी म्हणाव्या. सर्व ओळी पाठ झाल्या की मग सलगपणे संपूर्ण पाढा म्हणावा. २ ते १० पर्यंतचे पाढे पाठ झाले की सलगपणे सर्व पाढे म्हणण्याचा सराव करावा.
याचप्रमाणे अकराचे व एकवीसचे पाढे पाठ करावेत. शाळेत शिक्षकांनी व घरात पालकांनी असे पाढे नियमितपणे म्हणवून घ्यावेत.
मला आठवते. लहानपणी प्राथमिक शाळेत असताना दर शनिवारी प्रार्थना झाल्यावर बेच्या पाढ्यापासून सुरुवात करून तीसच्या पाढ्यापर्यंत सर्व पाढे विद्यार्थी मोठ्या आवाजात एका कोरसमध्ये म्हणत असत. कोणत्या वर्गाचा आवाज मोठा अशी त्यावेळी चढाओढही लागे. यात ज्या मुलाचे पाढे पाठ नाहीत त्याचेही पाढे आपोआप पाठ होण्यास मदत होत असे. देवाच्या आरत्या जशा एकत्र म्हटल्याने आपोआप पाठ होतात तसेच पाढ्यांच्या बाबतीतही होते.
इंग्रजी माध्यमातील मुलेही टू टूज आर फोर ( Two twos are Four), टू थ्रीज आर सिक्स (Two threes are Six) या पद्धतीने पाढे पाठ करू शकतात.
काही पालक विद्यार्थ्याला क्रमवार बेरीज करून पाढे तयार करायला शिकवितात. पाढ्यातील कार्य-कारण भाव (लॉजिक) त्यामुळे मुलाला कळेल व पाठांतराची गरज भासणार नाही असे त्यांना वाटते. मात्र या पद्धतीने शिकविल्यास लॉजिक कळले तरी प्रत्येक संख्या काढताना गणिती क्रिया करावी लागते व त्यात वेळ जातो. मात्र पाढे पाठ असणारा मुलगा चटकन उत्तर देऊ शकतो.
पाढ्यातील कार्य-कारण भाव समजणे आवश्यक असले तरी पाढे पाठ केल्यानंतर ते शिकवणे अधिक श्रेयस्कर ठरेल.
भाषा शिकताना देखील आपण वाचलेली किंवा ऎकलेली वाक्ये वापरतो व नंतर त्यातील व्याकरणाचा अभ्यास करून नवी वाक्ये तयार करायला शिकतो. अंकगणित शिकताना हीच पद्धत वापरणे सोयीचे ठरते.