पैठण

प्राचीन काळी प्रतिष्ठान या नावाने इतिहास प्रसिद्ध असलेले हे तीर्थस्थान गोदावरी नदीच्या तीरावर असून ते महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. पूर्वी दक्षिणकाशी म्हणून ते ख्यातनाम होते. यावरूनच धार्मिकदृष्ट्या पैठणचं महत्त्व किती थोर होतं याची कल्पना येईल. शककर्त्या सातवाहन राजवंशाची ही राजधानी होती. महाराष्ट्रातील थोर संत श्री एकनाथांचे हे जन्मस्थान, याच तीर्थस्थानी त्यांनी गोदावरी नदीत समाधी घेतली. संत एकनाथांनी लिहिलेलं एकनाथी, भागवत, त्यांच्या गवळणी आणि भारूडं मराठी संत साहित्यात अजरामर आहेत. आचरणातून आणि साहित्यातून सतत समानतेचा विचार मांडणारे ते एक लोकप्रिय संत होते.
ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले ते याच नगरीत. वारकरी संप्रदायाइतेकच महानुभावी पंथ व जैन धर्मीयही पैठणला तीर्थस्थान म्हणून मन:पूर्वक मानतात हे विशेष. नाग-षष्ठीला येथे मोठा उत्सव असतो.
वारकरी संप्रदायात पैठणची वारी करणारे अनेक वारकरी आहेत. प्राचीन काळापासून पैठण हे जरीकाम व कलाकुसर यासाठी प्रसिद्ध असून पैठणी तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
येथील एकनाथ महराजांचा वाडा, तेथील पाण्याचा रांजण, संत एकनाथांची समाधी, दत्तमंदिर, नृसिंह मंदिर, नवनाथ मंदिर, तीर्थखांब ही स्थळं भाविकांना वंदनीय आहेत.